विदर्भाची प्रसिद्ध लोककला
खडीगंमत
विदर्भाची खडीगंमत: तमाशाची जननी
विदर्भातीलच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रातील संतांची परंपरा प्रारंभ होण्यापूर्वी येथे लोकनाट्याचा उदय झाला होता असे दिसून येते. दैनंदिन श्रमाने थकलेल्या जीवाला विरंगुळा म्हणून लोकनाट्य जन्मास आले असा युक्तिवाद केला जातो. त्यानुसार नाटक व संतसाहित्य यांच्यापूर्वी हे लोकनाट्य कष्टकरी वर्गाने निर्माण केले असे प्रतिपादन करता येते.
१. खडीगंमत : विदर्भाचे प्राचीनत्व व इतिहास
महाराष्ट्रापेक्षाही विदर्भ हे नामाभिधान प्राचीन आहे. विदर्भाचा प्राचीनतम उल्लेख 'भीमाय विदर्भाय' असा ऐतरेय ब्राह्मणात येतो. तसाच 'भार्गवो वैदर्भि:' असा प्रश्नोपनिषदात येतो. शिवाय रामायणात सीताशोधार्थ निघालेला सुग्रीव वानरांना उद्देशून बोलताना विदर्भानृषि असा विदर्भाचा उल्लेख करतो. तसेच एष पंथा विदर्भानाम् असा उल्लेख महाभारताच्या वनपर्वात येतो. रामायणाच्या उपरोक्त श्लोकावरून असे स्पष्ट होते की दक्षिणेतील गोदावरीचा परिसर जेव्हा अरण्यमय होता तेव्हा विदर्भाची वसाहत होऊन गेली होती. म्हणजेच विदर्भ ही आर्याची दक्षिणेकडील पहिली वसाहत होय. आणि येथील मुंडा जमातीमधील लोपामुद्रा (लोपामुंडा?) हिच्याशी विवाह करून धानाची शेती या परिसरात पहिल्यांदा करणारा अगस्ती हो आद्य वसाहतकार होता. 'सरस्वती जन्मभू' असा विदर्भाचा गौरव करणारा राजशेखर विदर्भालाच 'महाराष्ट्र' संबोधतो. 'वरदातटनामक महाराष्ट्रम्' अशी विदर्भाची वाखाणणी त्रिविक्रमाने 'नलचम्पू'त केली आहे. 'अनर्घराघव' या आपल्या काव्यात मुरारी कवीदेखील विदर्भ हाच महाराष्ट्र असल्याचे सांगतो. नागपूर येथे सीताबर्डीला सापडलेला शके १००८ चा शिलालेख वाचल्यानंतर कळते की या नागपूर भागावर राज्य करणारा महासामंत स्वतःला 'महाराष्ट्रकूट' वंशातला म्हणवून घेई.
२. खडीगंमत : क्षेत्रमर्यादा
खडीगंमत हे लोकनाट्य ज्या प्रदेशात सादर केले जाते तोदेखील विदर्भ हाच होय. विदर्भातील थेट बुलढाणा जिल्ह्यापासून तर पूर्वेकडील गोंदिया जिल्ह्यापर्यंत हे लोकनाट्य खेळले जाते. नागपूर जिल्हा हा या लोकनाट्याचा बालेकिल्ला मानला जातो. शाहिरांच्या संख्येचा विचार करता नागपूरनंतर झाडीपट्टीतील भंडारा व गोंदिया या जिल्ह्यांचा क्रमांक लावला जातो. याशिवाय चंद्रपूर व गडचिरोली या झाडीपट्टीच्या उर्वरित जिल्ह्यांमध्येदेखील खडीगंमत लोकांना आवडते. तिकडे वर्धा, यवतमाळ व अमरावती हे जिल्हेदेखील खडीगंमतीला पूरक आहेत. अर्थात या परिसरात तिला अनेक जण गैरसमजातून 'दंडार' असे संबोधतात. नारायण निखाते यांच्या म्हणण्यानुसार दिवसा घरोघरी फिरणारी खडीगंमत ही 'दंडार' या नावाने ओळखली जाते; तर रात्री दाखविला जाणारा कार्यक्रम खडीगंमत या नावाने संबोधण्यात येतो. इतकेच नाही तर छिंदवाडा, बैतूल, बालाघाट, शिवनी या विदर्भाच्या सीमेलगतच्या मध्यप्रदेशातील जिल्ह्यांमध्येदेखील खडीगंमत तेवढीच लोकप्रिय आहे. अर्थात तिकडेदेखील तिला चुकीने 'दंडार' असेच म्हटले जाते. पूर्वलेखनातील अनास्था खडीगंमत या विषयावर अतिशय त्रोटक लेखन झालेले दिसून येते. अखिल विश्वातील ज्ञानाचा संग्रह केला असल्याचा टेंभा मिरविणारे 'मराठी विश्वकोश' आणि 'भारतीय संस्कृतिकोश' जसे दंडार या लोकनाट्यासंदर्भात मौन पाळतात तसेच खडीगंमतीच्या संदर्भातही मूक असतात. तमाशा या लोकनाट्यप्रकारासंबंधी लिहिताना 'विदर्भातील तमाशा असा उल्लेख करून ते काही माहिती सांगतात; तोच त्यास अपवाद म्हणावा लागेल. डॉ. गंगाधर मोरजे, डॉ. सरोजिनी बाबर. रा. चिं. ढेरे, डॉ. प्रभाकर मांडे, डॉ. तारा भवाळकर या लोकसाहित्याच्या क्षेत्रातील दिग्गजांनीदेखील खडीगंमतीसंदर्भात काही बोलायचे नाही असेच ठरविले आहे असे त्यांच्या प्रचंड ग्रंथसंभाराचे अवलोकन केले असता आढळून येते.
३. खडीगंमत : अंतरंग
कमीत कमी पात्रांमध्ये आणि कमीत कमी वाद्यांचा अथवा साहित्याचा वापर करून आपली कला सादर करण्याची भूमिका खडीगंमत हे लोकनाट्य स्वीकारीत आलेले आहे.
पात्रे
यात हातात डफ घेऊन खड्या आवाजात गायन करणारा हरहुन्नरी शाहीर हे प्रमुख पात्र असते, त्याच्या सोबतीला मनोरंजनाचे व्रत स्वीकारलेला गमत्या असतो. शिवाय नखरेबाज नाच्या शेजारी असतो. हा स्त्रीवेशधारी गोंडस मुलगाच असतो. याला 'लमडा' हे झाडीबोलीतील स्थानिक नाव आहे. सोबत ढोलक वाजविणारा ढोलक्या उपस्थित असला की खड़ी गंमत उभी राहते. म्हणजे या लोकनाट्यात केवळ चार पात्रे गणपूर्तीकरिता आवश्यक आहेत. अर्थात ही प्रारंभीच्या काळातली पात्ररचना झाली. तिच्यात कालांतराने वाढ होत गेली. सुराकरिता चोनक्या अथवा तुणतुणेवाला आला तालाकरिता टाळ वाजविणारा टाळकरी आवश्यक वाटायला लागला. शाहिराच्या गायनाची 'री' ओढणारा आणि त्याच्यासोबत डफ वाजविणारा एक सुरत्या आवश्यक वाटायला लागला. अशी ही पात्रसंख्या चारावरून सातवर गेली. अनेकदा एका नाच्याने समाधान वाटेनासे झाले. त्यामुळे त्याच्या सोबतीला आणखी दुसरा नाच्या ठेवण्याचा प्रघात पडला, आणि ही पात्रसंख्या आठ झाली.
वाधे
यासोबत खडीगंमत सादरीकरणाकरिता आवश्यक असलेल्या वाद्यांचादेखील विचार करणे योग्य राहील. खडीगंमत ढोलकी, डफ, चोनका व टाळ या चार वाद्यांवर आपला डोलारा सांभाळत असते.
ढोलकी
महाराष्ट्राच्या सर्वच लोकनाट्यांमध्ये ढोलकीला महत्वाचे स्थान आहे. सर्वत्र एकसुरी ढोलकी वापरतात; तर दोनसुरी ढोलकी खडीगंमत वापरत असते. तिला दोन पुडे असतात. ते शेळीच्या किंवा घोरपडीच्या चामड्याचे बनविले असतात. त्यांच्या आतल्या भागात रोगण लावले असते, तर बाहेर शाई मढवलेली असते. दोन्हीकडील पूड दोरीने आवळलेले असतात. त्यात एक 'नर' असतो, तर दुसरे 'मादी' असते. ढोलकीच्या पुडाला प्रत्येक बाजूस नऊ छिद्रे असतात. त्यांच्यात दोरी ओढून आवळण्याची सोय केली असते. पूड आणखी घट्ट करण्याकरिता दोरीच्या मध्ये बोटभर लांब काड्यांचा वापर करतात त्यांना पीळ देऊन सुराच्या गरजेनुसार ढोलक चढविण्याचे अथवा उतरविण्याचे काम ढोलक्या करीत असतो.
डफ
शाहिरा हातातील डफ हे खडीगंमतीचे महत्वाचे वाद्य होय. डफगान या मूळ नावातही ते आहे, इतके ते पुरातन आहे. डफ व ड्रम यांचे मूळ डमरू होय. डफाचेही अनेक प्रकार आहेत. मूळ डफ हा अष्टकोणी किंवा षटकोणी असतो. 'चंग' अन्य प्रकार. 'चंग' मात्र गोलाकार असतो. हलगी ही त्यापेक्षाही आकाराने लहान असते. या साऱ्यांत लहान डफली किंवा खंजरी होय. तर 'डपरी' ही आकाराने सर्वात मोठी असून ती या परिसरातील वाजंत्री विवाहप्रसंगी वाजवितात. खडीगंमतची दुय्यम जिंकण्याचा विडा उचलण्याचे काम लक्षात घेऊनच 'चंग बांधणे' असा वाक्प्रचार 'प्रतिज्ञा करणे' या अर्थाने मराठीत रूढ झाला असावा. याशिवाय चढणे या अर्थाचे झाडीबोलीतील 'चंगना' हे क्रियापदही विचारात घेण्यासारखे आहे. शिवाय 'चंगेरी' नामक गोलाकार झोपाळा या परिसरातील आई आपल्या बाळाला झोपविण्यास वापरीत असते. दुय्यम खडीगंमत सादर करताना दोन्ही शाहीर परस्परावर चढाओढ करून प्रेक्षकांना आनंद देत असतात. त्याअर्थी हे दोन्ही शब्द चंग या वाद्याची अर्थवृद्धी करण्यास साहाय्यभूत ठरतात असे आढळून येईल.
चोनका
खडीगंमतीला चोनका किंवा तुणतुणा हे सूर देणारे वाद्य असते. एका दंडगोलाकार लाकडी डब्याचे वरचे तोंड उघडे असते, तर खालच्या तोंडास शेळीचे किंवा घोरपडीचे चामडे मढविलेले असते, त्यास दोन-अडीच फूट लांब बांबूची दांडी असून खालून आलेली तार तिच्या वरच्या टोकाला गुंडाळून ठेवली असते. तेथे असलेल्या खुंटीला पीळ देऊन ती तार ढोलकीच्या तालास अनुरूप आवळण्याची किंवा सैल करण्याची सोय केली असते.
मंजिरा किंवा टाळ
झांज, टाळ व मंजिरा हे तिन्ही समानार्थी समजले जात असले तरी त्यांच्यात आकाराचा भेद असतो. झांज आकाराने सर्वात मोठा असतो; तर टाळ त्या मानाने लहान असतो. अगदी लहान आकाराचा टाळ म्हणजे मंजिरा होय. नारळाच्या कवठीसारख्या अर्धगोलाकार असलेली मंजिरी खडीगंमतीमध्ये प्रामुख्याने वापरली जाते. असे धातूचे दोन अर्धगोल दोरीने आत गाठ पाडून बांधले असतात. दोन हातात ते धरून वाजवीत ढोलकीला साथ देण्याचे काम मंजिरावादक किंवा टाळकरी करीत असतो.
लावणीतील उल्लेख
ढोलक्याची ढोलकी, चोनक्याचा चोनका आणि टाळवाल्याचा यळ किंवा मंजिरा एवढेच साहित्य खडीगंमत महत्वाचे मानते. या वाद्यांचा उल्लेख एका लावणीतदेखील आला आहे. ती पुसी लावणी अशी आहे.
चतूर ग्यानी सभेमध्ये बसले, ऐका चित्त देऊन
ढोलक, सूर, मंजिरा, छडीचे नाते सांगा न
सूर-छडीच्या नात्यामध्ये होते कोनकोन ?
देतो साहा महिन्याची मुदत, तुरा ठेवा गहान ॥
येथे ढोलकीशिवाय सूर म्हणजे चोनका आणि मंजिरा म्हणजे टाळ यांचा उल्लेख येथे आलेला आहे. याशिवाय छडी हे आणखी एक वेगळे साधन सांगितले आहे.
छडी
आता खडीगंमत वापरताना आढळत नाहीत. तरी तिचा वापर मागीत पिढीतील कलावंत करीत असावेत असा निष्कर्ष या लावणीवरून काढता येतो. कारण सूर व छडी यांच्यातील नाते विचारण्याइतके हे साधन त्या काळी महत्वाचे मानले गेले होते. दोन फूट लांब गोलाकार काठी घेऊन तिला सभोवताल आकडे लावतात. या प्रत्येक आकड्याला एकएक घांगरी अडकविली असते. ही झाली छडी. गायक किंवा झिलकरी गाताना ती विशिष्ट लयीत हलवून चोनक्याच्या सूरास साथ देत असतो.
क्लोट किंवा क्लॅरिनेट
सारंगीचा आधुनिक अवतार असलेली क्लोट प्रारंभी तुकडोजी महाराजांच्या भजनात आली. महाराजांचा आवाज पहाडी असल्यामुळे तो झिलकऱ्यांकडून उचलला जात नसे. त्यावर उपाय म्हणून त्यांनी क्लोटचा वापर सुरू केला. त्यांच्याकडून मग खडीगंमतीने क्लोटचा स्वीकार केला. म्हणजेच क्लोट वाजविणारी एक व्यक्ती खडीगंमतमध्ये पुन्हा वाढली, काही मंडळांनी बेंजोचाही उपयोग सुरू केला आहे. म्हणून बँजोवादकाचीही उपस्थिती आवश्यक ठरली. अशा प्रकारे काही मंडळांकडे या लोकनाट्यातील पात्रांची संख्या आज दहापर्यंत वाढत गेलेली आढळून येते.
४. खडीगंमत : पूर्वरंग
इतर लोकनाट्यांप्रमाणे खडीगंमतदेखील दोन भागांमध्ये विभागली जाते. ते भाग म्हणजे पूर्वरंग व उत्तररंग हे होत. प्रारंभीच्या भागास 'पूर्वरंग' असे नाव असून नंतरच्या भागास 'उत्तररंग' असे संबोधण्यात येत असते. पूर्वरंगात गण व गवळण यांचा समावेश होतो. तर खडीगंमतचा उर्वरित भाग उत्तररंगात समाविष्ट करण्यात येतो.
गण: गणेशाचे स्तवन
गोंधळ आणि तमाशा या महाराष्ट्रातील अन्य लोकनाट्यांप्रमाणे ही खडीगंमतदेखील गणाने सुरू होते. गण म्हणजे गणेशाचे स्तवन होय. शाहीर गण गातो तेव्हा अन्य पात्रे दोन्ही हात जोडून स्थिर उभी असतात. गण गाताना नाचाला मज्जाव असतो. गण ही श्रीगजाननाची स्तुती असली तरी त्यात गणेशासोबत शंकर व पार्वती यांचाही उल्लेख येतो. वस्ताद शाहीर श्रीराम मेश्राम व त्याचे शिष्य अंबादास नागदेवे गात असलेला हा गण पहा.
'गणराज नाचला, वर चंद्र हासला,
डळमळाया लागली वसुंधरा
ऊठ गिरिजा राणी, तो पिनाकपाणी,
रागाने जाळतो बराचरा ऐक ॥
एकदा गजाननाच्या उंदराकडे
हासला पाहून चंद्र, रूप आगळे
हात-पाय केवढे ? ब्रह्मांड येवढे
पोट कसे वाढले लंबोदरा ? ॥२॥
हा गण लोककलावंताने रचला आहे यावर कोणाचा विश्वास बसेल ? अगदी संतांचा, नव्हे पंतांचा थाट प्रत्येक शब्दात दिसतो. आपली लोकप्रतिभा भगवंताचे गुणवर्णन करताना कशी नागर पद्धतीनुसार प्रफुल्लित होते याचे हे सुंदर उदाहरण आहे. अशा मंगल प्रसंगी जणू अभिजनाचे भूत त्यांच्यात संचारते असेच म्हणावे लागेल.
गवळण
गण आटोपल्यानंतर गवळण गायली जाते. यात नाच्याला चांगलाच वाव असतो. त्याच्या विविध विभ्रमातून प्रेक्षकांना आकर्षित केले जाते. मूळात मथुरेला जाणाऱ्या गौळणी आणि पेंद्या व आपल्या अन्य सवंगड्यांसह त्यांना अडविणारा श्रीकृष्ण हा विषय महाराष्ट्रालाच नव्हे तर अवघ्या भारतालाच प्रिय आहे. केवळ लोकसाहित्यातच कशाला, आपल्या संतांनाही तो इतका आवडला की ज्ञानेश्वरांपासून तर सुरदासांपर्यंत सर्वच संतांनी ही सारी कृष्णलीला पुन्हापुन्हा आळवली आहे. गोंधळ, तमाशा या अन्य लोकनाट्यांप्रमाणेच खडीगंमतही गवळण सादर करून आपल्या ग्रामीण प्रेक्षकांना खिळवून ठेवीत असते. लिखित संहिता नसल्यामुळे ती स्थानिक झाडीबोलीतील उत्फूर्त संवादांनी मनःपूत स्वातंत्र्य भोगत त्यांना रिझविते.
सरन व रुसवा
गवळण सादर करताना शाहीर तात्पुरता श्रीकृष्ण बनतो त त्याचा साथीदार पेंद्या होतो. नाच्या राधेचा वेश घेतो; तर गमत्या डोईवर पदर घेऊन मावशीचे रूप धारण करतो. गवळणीचा शेवट 'सरन' 'शरण' या वेगळ्या पद्यप्रकाराने होतो. आपला रस्ता अडविणाऱ्या श्रीकृष्णाला अथवा त्याच्या सवंगड्यांना गोपिकांनी केलेली विनवणी म्हणजे 'सरन' होय. अशी विनवणीची गीते अन्य लोकनाट्यांमध्ये आणि संतांच्या रचनांमध्येही आपणास आढळून येतात. पण या गीतप्रकाराला 'सरन' हे स्वतंत्र नामाभिधान प्रदान करण्याचा मान केवळ खडीगंमत या लोकनाट्याला प्राप्त झाला आहे, याची वेगळी नोंद घेणे आवश्यक आहे. गवळण गाताना 'रुसवा' हा एक अन्य रचनाप्रकार आपल्याला आढळून येतो. आपल्या नवऱ्याशी किंवा खोडी काढणाऱ्या कृष्णाशी गोपिकेने धरलेला अबोला व्यक्त करणारे गीत म्हणजे 'रुसवा' होय. अर्थात अशा रचनेला 'रुसवा' हे स्वतंत्र नाव देण्याचा पायंडा केवळ खडीगंमत याच लोकनाट्याने पाडलेला दिसून येतो.
५. खडीगंमत : उत्तररंग
खडीगंमत पहाण्यास आलेला प्रेक्षक उत्तरंगाचीच वाट पहात असतो. यात लावण्यांचे विविध प्रकार वापरून त्यांच्यानुसार संपादणूक किंवा बतावनी सर्व पात्रे करीत असतात. योग्य अभिनयाचा आविष्कार करून स्थानिक झाडीबोलीचा वापर करीत प्रेक्षकांच्या हृदयास हात घालण्याची संधी उत्तररंगात शाहीर, गमत्या व नाचे घेत असतात. कधीकधी प्रेक्षकांच्या फर्माइशीलाही महत्व देण्यात येते. रात्रभर आपल्या प्रेक्षकांच्या मनाचे समाधान करण्याचे महत्वाचे कार्य उत्तररंगात खडीगंमत पार पाडत असते.
छिटा व दोहा
खडीगंमत अधिक आकर्षक होत असते कलगी व तुरा या दोन घराण्यांच्या द्वंद्वात्मक कार्यक्रमामुळे यास 'दुय्यम असा खास झाडी शब्द खडीगंमत वापरते. यात सवाल-जवाब प्रामुख्याने असतात. शिवाय 'छिटा' हा स्वतंत्र प्रकार वापरला जातो. तसेच चार ओळीचा 'दोहा' यास फार महत्व असते. 'जबाबी दोहा' हा त्याचाच एक प्रकार असतो, 'झगडा' हा अन्य रचनाप्रकार यात ऐकायला मिळतो. 'जबाबी झगडा' आणि 'जोड झगडा' हे त्याचे अन्य प्रकार असतात. या सर्व रचनाप्रकारांच्या गायनाने ही दुय्यम रंगत असते. परंपरागत पुराणातील प्रश्नोत्तरे आणि तत्वज्ञानपर भेदिक शाहिरीशिवाय वरील रचनाप्रकार खडीगंमत या लोकनाट्याचे अनन्यसाधारण वेगळेपण अधोरेखित करतात. खडी गंमत गद्याला अत्यल्प स्थान देते. येथे सारे गायनातूनच व्यक्त केले जाते. कधी तीन-चार कडव्यांच्या एका लावणीत प्रश्न असतो, तर दुसरी उत्तराची लावणी तेवढ्याच विस्ताराने गायली जात असते. तर कधी केवळ एकाच कडव्याने उत्तर सादर केले जाते.
बैठी गंमत व बैठी दंडार
पोवाडा हा रचनाप्रकार उभ्याने गाण्यापेक्षा बसून गाण्यात खरी मजा असते. म्हणूनच खडीगंमत ही अनेकदा 'बैठी गंमत' या रूपातही सादर केली जाते. तसे पाहिले तर गंमत आणि दंडार या दोहोतही खड़ी व बैठी ही विशेषणे वापरली जातात. उभ्याने केलेली दंडार ही खड़ी दंडार' आणि बसून केलेली दंडार ती 'बैठी दंडार'. बैठी दंडार आणि बैठी गंमत या दोन्ही प्रकारांमध्ये गायनात पोवाडा या रचनाप्रकाराला महत्वाचे स्थान असते. विशिष्ट सणाच्या किंवा उत्सवाच्या निमित्ताने कोणाच्या तरी वाडयाच्या ओसरीवर निवडक श्रोत्यांच्या उपस्थितीत ही बैठी गंमत रात्रभर सादर केली जाते. नागपंचमी, जन्माष्टमी, पोळा, होळी, गौर, शिवरात्री ही त्याकरिता काही निमित्ये असतात. आता तर कोणतेही निमित्त चालते. निमित्ताकरिता हटून न बसता केव्हाही ती दाखविली जाते.
संपादणूक अर्थात बतावनी
लावणीचे गायन आपल्या खड्या आवाजात शाहीर करीत असतो. त्या लावणीतील वर्णनानुसार अन्य पात्रे संवाद व अभिनय यांच्या साहाय्याने जी संपादणूक करीत असतात तिला 'बतावनी' म्हणतात. 'बतावनी' हा खास झाडीबोलीतील शब्द असून तो कृत्रिम आचरण' अथवा 'सोंग' यास पर्याय म्हणून व्यवहारात वापरला जातो. रिकाबी में पाव, ब्रह्म बताव' ही राजा जयंत्पाळाने आद्यकवी मुकुंदराजांना में केलेली विनंती सर्वश्रुत आहे. या 'बताव' इतकाच 'बतावनी' हा शब्द जुना असून त्यापासूनच प्रचारात आला आहे असे म्हणता येईल.
मुजरा: भरतकाव्य
रात्र संपायला येते: प्रभातरंग दिसायला लागतो. तशी खडीगंमत आपला पसारा आवरता घेऊ लागते; शेवटला निरोप घ्यायची तयारी करू लागते. भरतवाक्य गायला प्रारंभ करते. अर्थात तेव्हा आपल्या देवदेवतांचे आणि गुरूंचे स्मरण करायला ती विसरत नाही. या भरतवाक्याला 'मुजरा' हे स्वतंत्र नाव आहे. उत्तर भारतातील प्रख्यात मुजरा वेगळा आणि हा मुजरा वेगळा हे सहजच लक्षात येईल. खडीगंमतीमधील हे मुजरागायन तमाशाने प्रारंभी स्वीकारले. पण तमाशाच्या प्रकृतीला ते जास्त काळ मानवले नाही. त्यामुळे तमाशाने अल्पावधीत त्याचा त्याग केल्याचे दिसून येते. आज तमाशातील मुजरा केवळ इतिहासकाळात नोंदला गेला आहे. पण खडीगंमत अनादि काळापासून चालत आलेला आपला हा पुण्यप्रघात अद्यापि विसरलेली नाही. हे या लोकनाट्यप्रकाराचे वेगळेपण होय.
सुर्यप्रार्थना
खडीगंमत या विदर्भातील लोकप्रिय रंजनप्रकाराचा समारोप सूर्याच्या प्रार्थनेने होतो हे मला (डॉ. हरिश्चंद्र बोरकर) जेव्हा उमरी येथील डोमाजी कापगते या एके काळच्या स्वतः रचना करून खडीगंमत सादर करणाऱ्या तत्कालीन शाहिराने सांगितले तेव्हा तर या लोकनाट्याचे अलौकिक वैशिष्ट्य गवसल्याचा साक्षात्कार झाला.
मोगलांच्या राजवटीत जुनी नावे हद्दपार होऊन तमाशा, शाहीर, शाहिरी ही जशी नावे प्रचलित झाली त्याच परिवर्तनाच्या परंपरेनुसार 'सूर्यप्रार्थना' या सोज्वळ प्रथेचे नामांतर घडून येऊन तिला 'मुजरा' हे नवे नाव प्राप्त झाले. पण या सूर्यप्रार्थनेत नुकत्याच उदय झालेल्या बालरवीच्या प्रति जशी कृतज्ञता व्यक्त केली जाते तशीच आपल्या इतर आराध्य देवता आणि गुरू यांचाही नामोल्लेख करून त्यांनादेखील आदरांजली वाहिली जाते आणि मायबाप प्रेक्षकांचा निरोप घेण्यात येतो. येथे वारकरी पंथाच्या प्रचलित आरतीने शेवट केला जात नाही. कसा आणि कशाला करणार ? कारण आरती करणे हा अगदी अलिकडचा प्रार्थनाप्रकार झाला. आपली खडीगंमत संतांनी बहरास आणलेल्या वारकरी पंथाच्याही पूर्वीची आहे. थेट वैदिक काळापासून चालत आलेली आर्याची वेदोक्त सूर्यभक्ती कायम ठेवीत खडीगंमतचा शाहीर सूर्यप्रार्थना गायला लागतो...
उगवत्या सूर्यनारायणा, तुला माझा नमस्कार
असू दे कृपा भक्तावर हा दूर कर सर्व अंधार
जगाचे हो भले, त्यामागे माझी भावना असू दे
जग सुखी तर मी सुखी दे तुझ्या कृपेने असू दे
ही माझी दुबळी नौका भवसागर करील पार
हे सारे शब्द कोणाला थेट ज्ञानेश्वरांच्या 'भावार्थदीपिके'तील (इ. स. १२९०) पसायदानाची आठवण करून देतील; तर कोणाला आदिम ऋषींनी गायिलेल्या ऋचांची स्मृती जागृत करतील. ही प्रार्थना कानावर पडताच ती ग्रामीण कवीने रचली नसावी, तर एखाद्या तपोनिष्ठ महर्षीच्या मुखातून ही अमृतवाणी उमटली असावी असा निर्वाळा कोणी विद्वान देईल.
आमच्या अशिक्षित पण सुसंस्कृत अशा प्रतिभावंत लोककलावंतांनी ही अशी भैरवी गात आपण सूर्योपासक ऋषींचे सच्चे वारसदार असल्याची ग्वाहीच दिली आहे असे म्हणता येईल !
खडीगंमत सादर करताना अशा या लोककलावंतांची पात्ररचना कशी असते ते आपण पुढील प्रकरणात सविस्तर पाहू या.